प्रेषित मोहम्मद संपूर्ण विश्वासाठी कृपा आणि दयेचे स्रोत — प्रा. वाजेद अली खान
जाफराबाद/विशाल देशमुख,दि.9
जाफराबाद येथे प्रेषित परिचय कार्यक्रम
जाफ्राबाद – ईश्वराने प्रेषित मोहम्मद यांना केवळ एका विश्वासाठी नव्हे तर तब्बल सात विश्वासाठी कृपा आणि दयेचा स्त्रोत म्हणून या भूतलावर पाठविले. संपूर्ण मानव जात ही एकाच मातापित्याची संतान असून सर्वांशी प्रेमाने वागणे हाच खरा धर्म आहे. या विश्वाचा निर्माता एकच ईश्वर असून या जीवनात त्याची ओळख करून प्रत्येकाने आपल्या पृथ्वीतलावरील व पारलौकिक जीवनाचे सार्थक करून घ्यावे. असा महान संदेश प्रेषित मोहम्मद यांनी आज पासून १४६० वर्षांपूर्वी संपूर्ण विश्वाला दिला. पवित्र धर्मग्रंथ कुराण आणि प्रेषित मोहम्मद यांची जीवनी यामाध्यमातून शांती सुरक्षितता आणि समर्पणाची एक महान जीवन प्रणाली प्रेषित मोहम्मद यांनी संपूर्ण विश्वाला दिली. ज्यात प्रत्येक मानवी समस्यांचे निराकरण सामावले आहे. असे विचार इस्लामचे गाढे अभ्यासक तथा जमाते इस्लामी हिंद नाशिकचे अध्यक्ष प्राध्यापक वाजिद अली खान यांनी व्यक्त केले. जाफराबाद येथे रविवारी जमाते इस्लामी ही तर्फे आयोजित प्रेषित परिचय कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
यावेळी मंचावर सिद्धार्थ महाविद्यालयाचे प्राचार्य र.तू. देशमुख, डॉ. पी.जी. देशमुख, अब्दुल खुद्दुस, कुंडलिक मुठ्ठे, ज्ञानेश्वर निकम, हबीब ऐदरुस चाऊस, कबीर बाबा आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात हाफिज सय्यद नाझीम यांच्या कुराण पठणाने झाली. यावेळी प्राचार्य र.तू. देशमुख यांनीही पवित्र धर्मग्रंथ कुराण मध्ये प्रत्येक मानवी समस्येचे निराकरण केले असल्याचे सांगितले. यावेळी डॉ. पी. जी. देशमुख, अब्दुल खुद्दूस, कुंडलिक मुठ्ठे यांनीही आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जमाते इस्लामी हिंदचे जाफराबाद शहराध्यक्ष मुमताज अली खान यांनी केले. सूत्रसंचालन असलम पठाण व रिजवान शेख यांनी केले. आभार नसीम शेख यांनी मानले. कार्यक्रमाला सर्वधर्मीय समाज बांधवांची मोठी उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी जमाते इस्लामी हिंदचे मुमताज अली खान, ताहेर काझी, एकबाल खान, तालेब पठाण, युनूस खान, इद्रिस खान, शेख रिजवान, शेख नसीम आदींसह युथ मुव्हमेंट ऑफ महाराष्ट्र, एस. आय. ओ. तथा जमाते इस्लामी हिंद च्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला.
फोटो ओळी – जाफराबाद येथे आयोजित प्रेषित परिचय कार्यक्रमात बोलताना मुख्य वक्ते प्रा. वाजिद अली खान.


