“घर घर संविधान” कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी- सदस्य (सचिव दर्जा) गोरक्ष लोखंडे
जालना/प्रतिनिधी,दि.10
भारतीय राज्यघटनेबाबत जागृकता निर्माण व्हावी तसेच भारतीय संविधानाच्या मुलभुत तत्वांची माहिती समाजातील उपेक्षित घटकास व्हावी, यासाठी “घर घर संविधान” कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. नागरिकांना व विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाच्या महत्त्वपूर्ण मूल्यांबद्दल जागरूक करणे आणि त्यांचे हक्क व कर्तव्ये समजून देणे हा यामागचा उद्देश आहे. त्यामुळे जिल्ह्यात ”घर घर संविधान” कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशा सुचना महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य (सचिव दर्जा) गोरक्ष लोखंडे यांनी दिल्या.
जालना येथील शासकीय विश्रामगृहात सोमवार दि. 10 नोव्हेंबर 2025 रोजी सदस्य (सचिव दर्जा) गोरक्ष लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय संविधानास 75 वर्षे पूर्ण व सामाजिक न्याय विभागाच्यावतीने संविधान अमृत महोत्सव सन 2024-25 पासून “घर घर संविधान” कार्यक्रम साजरा करण्याबाबत जिल्हास्तरीय समितीच्या बैठक संपन्न झाली. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, जिल्हा नियोजन अधिकारी सुचित कुलकर्णी, सहायक आयुक्त राजु एडके यांच्यासह समितीतील इतर सदस्य उपस्थित होते.
सदस्य श्री. लोखंडे म्हणाले की, “घर घर संविधान” कार्यक्रमाची रुपरेषा निश्चित करावी. तसेच विविध उपक्रम, कार्यक्रम, चर्चासत्रे आणि स्पर्धांचे शाळा, महाविद्यालये, शासकीय वसतिगृह, शासकीय निवासी शाळा, आश्रमशाळा, ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्था येथे आयोजन करावे. तसेच जिल्ह्याच्या एकुण तरतुदीच्या 0.5 तरतुद व जिल्हा वार्षिक योजनेच्या एकुण तरतुदीच्या 0.5 तरतुद घर घर संविधान योजनेसाठी खर्च करण्याबाबत सूचना सदस्य (सचिव दर्जा) गोरक्ष लोखंडे यांनी यावेळी दिल्या. तसेच ह.भ.प, हरिनाम सप्ताह तसेच किर्तनाद्वारे संविधानाबाबत जागृती करावी. जिल्ह्यात 26 नोव्हेंबर रोजी सर्व शाळा, महाविद्यालयामध्ये प्रास्ताविकेचे वाचन तसेच संविधानाचे महत्व समजावुन सांगणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे, असे सांगून संविधानाबाबत समाज माध्यमाद्वारेही जनजागृती करण्यात यावी. तसेच शासन निर्णयातील जिल्हास्तरीय समितीने वेळोवेळी घर घर संविधान कार्यक्रमाच्या कामाचा आढावा घेण्याचेही त्यांनी यावेळी निर्देश दिले. यावेळी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग मुंबई यांनी शासन निर्णय दि. 10 ऑक्टोबर 2024 अन्वये केलेल्या कार्यवाहीबाबतची सविस्तर चर्चा करण्यात आली.


