शिक्षकांच्या वेतनातून कपातीस मराठवाडा शिक्षक संघाचा विरोध!
गरज पडल्यास तीव्र आंदोलन उभारू! ● संस्थाचालक महामंडळाने ठराव मागे घ्यावा!
जाफराबाद/विशाल देशमुख,दि.23
शैक्षणिक संस्था चालविण्यासाठी शिक्षकांच्या वेतनातून पाच टक्के कपातीची परवानगी मागणारा ठराव संस्थाचालक महामंडळाने घेतला असल्याचे वृत्त प्रकाशित झाले आहे. मराठवाडा शिक्षक संघाने या ठरावास विरोध केला आहे. सदरील ठराव शिव फुले-शाहू-आंबेडकरी विचारांना हरताळ फासणारा, कर्मवीर भाऊराव पाटील-डॉ पंजाबराव देशमुख, कर्मवीर मामासाहेब जगदाळे, डाॅक्टर बापूजी साळुंखे, संत गाडगेमहाराज,बलभीमराव कदम आदी शिक्षण महर्षींच्या तत्त्वांना मातीमोल करणारा असल्याने तो मागे घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा ईशारा मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव व सरचिटणीस राजकुमार कदम यांनी दिला आहे.
मराठवाडा शिक्षक संघाचे सरचिटणीस राजकुमार कदम यांनी याबाबत दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात पत्रकात म्हटले आहे की, शिक्षकांच्या वेतनातून पाच टक्के कपातीची परवानगी मागणारा ठराव अतिशय दुर्दैवी आहे. वेतनेतर अनुदान लाभासाठी शासन सोडून शिक्षकांकडून खंडणी वसूल करणे समर्थनीय नाही. त्याचा मराठवाडा शिक्षक संघ निषेध करीत आहे. मराठवाडा शिक्षक संघाच्या प्रत्येक आंदोलनात संघटनेने वेतनेतर अनुदानाची मागणी लावून धरली आहे. महाराष्ट्राला संस्था चालविण्यासाठी स्वतःच्या बायकोच्या गळ्यातील मंगळसूत्र मोडणाऱ्या शिक्षण महर्षींची परंपरा आहे. शिक्षण क्षेत्राकडे बुद्धिमान विद्यार्थी वळावेत म्हणून शिक्षकांना चांगले वेतन देण्याची शिफारस कोठारी आयोगाने केली. शिक्षकांनी संघटीत होऊन आंदोलन व चळवळीतून बऱ्यापैकी वेतन मिळवले आहे. परंतु बऱ्याच संस्थाचालकांचा शिक्षकांच्या वेतनावर डोळा आहे.”तुम्हाला पगार मिळतो, आम्हाला काय मिळते?” असा सवाल धंदेवाईक संस्थाचालक शिक्षकांना करतात. वेतनेतर अनुदान नाही, घरभाडे नाही, विद्यार्थी आणण्यासाठी वाहन व त्याचा खर्च याचा भुर्दंड अनेक संस्थाचालक शिक्षकांवर बसवतात. नेमणूकीसाठी अनाधिकृतपणे लाखो रूपयांचे ‘डोनेशन’ घेतले जाते ते वेगळेच! पुरोगामी महाराष्ट्रात काही संस्थाचालकांनी शिक्षणाचे ‘पावित्र्य’ धोक्यात आणले आहे. अशा प्रकारे चाललेली वसुली ही ‘खंडणी’खोरीच आहे, तीला ‘सरकारी मान्यता’ मिळवून शिक्षकांच्या वेतनावर राजरोसपणे ‘डाका’ टाकण्याचा प्रकार मराठवाडा शिक्षक संघ सहन करणार नाही. नियमानुसार मिळणारे शासकीय अनुदानासाठी संस्थाचालक महामंडळाने शासनाशी असहकार आंदोलन व लक्षवेधी रस्त्यावरची लढाई लढावी, शिक्षक संस्थाचालकांच्या खांद्याला खांदा लावून आंदोलनात सहभागी होतील. अनेक संस्थाचालक शिक्षकांना सन्मान देणारे आहेत. त्यांनीही आणि शिक्षण प्रेमी नागरिकांनी या ठरावास विरोध करावा, असे आवाहन मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव, सरचिटणीस राजकुमार कदम, कोषाध्यक्ष ए. बी. औताडे, उपाध्यक्ष ज्ञानोबा वरवट्टे, सदस्य प्रेमदास राठोड,आरेफ कुरेशी, जिल्हाध्यक्ष रमेश आंधळे, सचिव संजय येळवंते, मार्गदर्शक डॉ मारुती तेगमपुरे, पुरुषोत्तम जुने,कोषाध्यक्ष नारायण मुंडे, कार्याध्यक्ष फरकुंद अली सय्यद, उपाध्यक्ष भीमाशंकर शिंदे, जगन वाघमोडे, सहसचिव गणेश चव्हाण, प्रद्युम्न काकड, दीपक शेरे, सोहम बोदवडे, महिला शहराध्यक्ष्य ज्योती पांगरकर मगर, संजय चव्हाण, प्रसिद्धीप्रमुख भगवान धनगे, हकीम पटेल, सदस्य तुकाराम पडघन यांनी केले आहे.


