महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -2025 वाहनांवर पक्ष प्रचाराचे कापडी फलक, झेंडे लावणेवर निर्बंध

जालना/प्रतिनिधी,दि.23
राज्य निवडणूक आयोगाने दि.15 डिसेंबर 2025 ते दि.16 जानेवारी 2026 या मतमोजणीच्या दिवसापर्यंत महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका 2025-26 साठी आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन जालना महानगरपालिका क्षेत्रामध्ये पक्ष प्रचाराचे कापडी फलक, झेंडे लावण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. असे आदेश जिल्हादंडाधिकारी आशिमा मित्तल यांनी जारी केले आहेत.
प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवर पक्ष प्रचाराचा झेंडा हा वाहनाच्या डाव्या बाजुला विंड स्क्रिन ग्लासच्या पुढे राहणार नाही आणि तो त्या वाहनाच्या टपापासून २ फुट उंची पेक्षा जास्त राहणार नाही. सदर वाहनांवर कापडी फलक वाहन चालकाच्या आसनामागे वाहनाच्या डाव्या व उजव्या बाजुने लावण्यात यावा, इतर कोणत्याही बाजुस तो लावता येणार नाही. सदर वाहनांवर लावावयाचा पक्ष प्रचाराचा झेंडा किंवा कापडी फलक संबंधित पक्षाचे जिल्हाध्यक्ष, उमेदवार व उमेदवाराचे निवडणूक प्रतिनिधी निवडणूक प्रचारासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडून अधिकृत परवानगी घेतलेल्या वाहनांव्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनांवर लावता येणार नाही. असेही आदेशात नमुद केले आहे.


