विजय विकास सामाजिक संस्थेतर्फे पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण उत्साहात संपन्न.
विद्यार्थ्यांचा मिळाला उत्तम प्रतिसाद

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.11
उरण तालुक्यातील युवक-युवतींना पोलीस भरतीत यशस्वी होण्यासाठी योग्य ती दिशा मिळावी,त्यांना चांगल्या पद्धतीचे मार्गदर्शन मिळावे, उरण मधील जास्तीत जास्त युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा या अनुषंगाने विजय विकास सामाजिक संस्थेच्यावतीने उरण तालुक्यातील जेएनपीए वसाहतीत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील सुमारे १५० युवक-युवतींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
आज अनेक युवक-युवती पोलीस भरती हे करिअर म्हणून निवडत असून त्यासाठी विविध प्रशिक्षण अकॅडम्यांमध्ये मैदानी व लेखी परीक्षेची तयारी करत आहेत. मात्र प्रत्यक्ष भरती प्रक्रियेत आपली तयारी कितपत आहे, गुणांकन कसे होते आणि निवडीसाठी किती गुण आवश्यक असतात, याची चाचणी घेण्यासाठी ही स्पर्धा उपयुक्त ठरली आहे . वास्तविक पोलीस भरती ज्या पद्धतीने घेतली जाते, त्याच धर्तीवर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेमध्ये मुलांच्या गटासाठी १६०० मीटर धावणे, १०० मीटर धावणे, गोळा फेक तसेच लेखी परीक्षा घेण्यात आली. मुलींसाठी ८०० मीटर धावणे, १०० मीटर धावणे, गोळा फेक व लेखी परीक्षा घेण्यात आली. स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या स्पर्धकांचा माजी जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर,उद्योजक विकास भोईर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.यावेळी भाजपचे ग्रामीण अध्यक्ष धनेश गावंड तसेच विविध पदाधिकारी उपस्थित होते.
मार्गदर्शक प्रशिक्षक राम चौहान, सोनल तांडेल,अजय तांडेल, हरेश्वर ठाकूर (भारत सरकारकडून कांस्यपदक प्राप्त) यांनी विद्यार्थ्यांना उत्तमपणे मार्गदर्शन केले व स्पर्धा परीक्षेची मैदानी व लेखी परीक्षेची कशी तयारी करावी याचे मार्गदर्शन केले. नागरी संरक्षण दला कडून प्रथमोचार पथकामधे असलेले यशश्री राव, वैष्णवी वर्तक, दौलत पाटील,प्रणित म्हात्रे ह्या स्वयंसेवकांनी प्रथमोचार केले. या प्रसंगी शशिकांत शिरसाठ (सहाय्यक उपनियंत्रक) उपस्थित होते. स्पर्धा सुरळीत पणे पार पडण्यासाठी टेंमकर सर, देवेंद्र कांबळे (प्राध्यापक फुंडे कॉलेज), प्रेम ठाकूर (रायगड जिल्हा मॅरेथॉन सुवर्ण पदक विजेते), महेश पाटील ह्यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे उत्तम आयोजन व यशस्वी नियोजन केल्याने सर्व विद्यार्थी, ग्रामस्थ, विद्यार्थ्यांचे पालक यांनी समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले आहेत.


