सेवेत प्रविष्ट होण्यासाठी असणारी टीईटी परीक्षा सेवेत कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना अनिवार्य करण्याचा घाट का? – विनोद कळंबे

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.9
सेवेत प्रविष्ट होण्यासाठी असणारी टीईटी परीक्षा सक्ती सेवेत कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना अनिवार्य करण्याचा घाट घालून राज्यातील अनेक शिक्षकांना सेवेतून मुक्त करण्याच्या राज्यकर्त्यांचा डाव आखला जात असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जाफराबाद तालुकाध्यक्ष विनोद कळंबे यांनी केला आहे.याविषयी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्री कळंबे यांनी म्हटले आहे की न्यायालयाच्या आडून शिक्षकांच्या मालगुटीवर टीईटीचे भूत बसविण्यात येत असून २५/३० वर्षांपूर्वी सेवेत प्रविष्ट झालेल्या शिक्षकांना टीईटी अनिवार्य करण्याचा घाट का घातला जातोय हे न लगडणारे कोडे आहे. विशेष म्हणजे कोणत्या कर्मचारी संवर्गासाठी अशा पद्धतीची परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली नाही. मग शिक्षकांसाठी हा अट्टाहास का असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे.महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे आधारस्तंभ संभाजी तात्या थोरात, राज्याध्यक्ष बाळासाहेब मारणे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यातील खासदार यांना निवेदन देऊन याविषयी त्यांना या प्रश्न संसदेत आवाज उठविण्या बाबत आग्रह करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व आमदारांना देखील निवेदन देऊन याविषयी विधिमंडळात आवाज उठविण्याचा आग्रह धरण्यात येणार आहे. राज्य लाखोच्या संख्येने असणाऱ्या शिक्षक वर्गाला जाणीवपूर्वक डिवचण्याचा प्रयत्न होत असून आगामी पदवीधर, शिक्षक तसेच जिल्हा परिषद महानगरपालिका निवडणुकीत शिक्षक आपले उपद्रव मूल्य नक्कीच दाखवतील असेही त्यांनी म्हटले आहे.


