तलाठ्याच्या घरातून १४३ ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास:मोर्शी येथील घटना; घरात कोणी नसल्याची संधी
मोर्शी/त्रिफुल ढेवले,दि.5
घरात कोणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांनी शहरातील सिंभोरा मार्गावरील व्यास लेआऊटमध्ये एका ग्राम महसूल अधिकाऱ्याच्या तलाठी घरात चोरी केली. चोरट्यांनी या घरातून तब्बल १४३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे व इतर चांदीचे असा सुमारे १४ लाखांचा ऐवज लंपास केला. ही चोरी झाल्याचे रविवारी दि. ४ सकाळी समोर आले.राजेश बाबुराव संतापे ४९, रा. व्यास लेआऊट, शंकरनगर, मोर्शी असे तक्रारदारांचे नाव आहे. राजेश संतापे हे मोर्शी तहसिल अंतर्गत ग्राम महसूल अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी काही महिन्यांपूर्वीच व्यास लेआऊटमध्ये घर बांधले आहे. त्यांचे जुने घरही मोर्शीतच आहे. त्या घरीसुद्धा त्यांचे जाणे येणे आहे. राजेश संतापे हे त्यांच्या कुटुंबासह शनिवारी काही कामानिमित्त अमरावतीला गेले होते. शनिवारी रात्री अमरावतीहून परत आल्यानंतर ते मोर्शीतील त्यांच्या जुन्या घरी मुक्कामी होते. त्यामुळे व्यास लेआऊटमधील त्यांचे घर बंद होते. दरम्यान रविवारी सकाळी ते व्यास लेआऊटमधील घरी आले असता त्यांना मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. यावरून त्यांना घरात चोरी झाल्याचा अंदाज आला. त्यांनी बेडरूममध्ये जाऊन पाहिले असता बेडरूममधील कपाटाचेही कुलूप तुटलेले होते व त्यामधील साहित्य अस्ताव्यस्त फेकल्याचे दिसून आले.
यावेळी चोरट्यांनी कपाटातील सोन्याचे १४३ ग्रॅम वजनाचे दागिने तसेच चांदीचे दागिने, मुलांना मिळालेले खाऊचे पैसे चोरून नेल्याचे समोर आले. चोरीला गेलेल्या सोन्याची सध्याच्या बाजारभावानुसार किंमत जवळपास १४ लाख रुपये आहे. या प्रकरणी संतापे यांनी मोर्शी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी तत्काळ संतापे यांच्या घरी जाऊन पाहणी केली. ठसे तज्ज्ञांनाही पाचारण केले होते. या चोरीमुळे शहरात खळबळ उडाली होती.चोरट्यांनी कपाटातील दागिने नेले चोरून सोन्याच्या बांगड्या ४० ग्रॅम, पोथ ३० ग्रॅम, तीन अंगठ्या २१ ग्रॅम, नेकलेस २७ ग्रॅम, दोन सोनसाखळ्या २२ ग्रॅम, लॉकेट ३ ग्रॅम, नथ असे एकूण १४३ ग्रॅम सोने चोरट्यांनी चोरले आहेत.


