भाजपकडून 25 जून हा ‘संविधान हत्या दिवस’ म्हणून साजरा केला जात असून, यानिमित्त विविध कार्यक्रमाचे, शासकीय कार्यालयात तसे फलकही लागले आहेत. यावर सामाजिक कार्यकर्ते ॲड. महेश धन्नावत यांनी आक्षेप घेत संविधान हत्या अशा प्रकारचा शब्दप्रयोग थांबवावा व हा दिवस ‘आणीबाणी विरोधी दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, अशी विनंती त्यांनी एका निवेदनाद्वारे बुधवार दि. 25 जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
ॲड. धन्नावत यांनी म्हटले आहे की, 1975 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने संविधान हत्या दिन म्हणून दिवसभर विविध कार्यक्रम आयोजित केले आहे. या पार्श्वभूमीवर ॲड. धन्नावत यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, संविधान हत्या असा शब्दप्रयोग करणे मनाला पटणारे नाही. आज आपण ज्या लोकशाही पद्धतीने मतप्रदर्शन करू शकतो, सरकारवर टीका करू शकतो, ते केवळ संविधानामुळेच शक्य झाले आहे. आपल्याला संविधानामुळेच मूलभूत हक्क मिळाले आहेत. संविधान आजही अबाधित आहे व भविष्यातही कायम राहणार आहे. चंद्रसूर्य असेपर्यंत संविधान हे अमर राहणारे असताना, संविधान हत्या हा शब्दप्रयोग कसा सुचला, असा प्रश्न उपस्थित करून कोणत्याही राजकीय किंवा सामाजिक कार्यक्रमामध्ये ‘संविधान हत्या दिवस’ असे बोलणे किंवा जाहिरपणे साजरे करणे अयोग्य आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 25 जून हा दिवस ‘आणीबाणी विरोधी दिन’ म्हणूनच लोकशाहीच्या रक्षणासाठी, विचारस्वातंत्र्य व नागरिक स्वातंत्र्याच्या महत्त्वासाठी साजरा करण्यात यावा, अशी मागणी ॲड. धन्नावत यांनी केली आहे.