मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा- राजकुमार कदम
शेतकऱ्यांना सरसकट एकरी पन्नास हजार रूपये मदत द्यावी
जाफराबाद/विशाल देशमुख, दि.23
मराठवाड्यात अतिवृष्टीने कहर केला आहे. शेतात जिकडेतिकडे पाणीच पाणी झाल्याने शेतातील सर्व पिके हातची गेली आहेत. त्यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट एकरी पन्नास हजार रूपये मदत द्यावी असे आवाहन मराठवाडा शिक्षक संघाचे सरचिटणीस राजकुमार कदम यांनी केले आहे.
राजकुमार कदम यांनी याबाबत दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, शेतकऱ्यांची सोयाबीन, उडीद, मुग, बाजरी आदी पिके काढणीस आलेली आहेत. कापसाची बोंडे फुटायची वेळ झालेली आहे, मात्र मराठवाड्यास अभूतपूर्व पावसाने झोडपून काढले आहे. नद्या नाल्यांनी आपली पात्रे सोडून देत शेतालाच नद्यांचे स्वरूप आले आहे. शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.सोयाबीन, उडीद, मुगाचे शेण झाले आहे, कापसाची बोंडे सडली आहेत, कांद्याची लागवड वाया गेली आहे. निसर्गाने अवकृपा केल्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या मदतीस ताबडतोब धावून येणे गरजेचे आहे. पंचनामे, पहाणी यात कालापव्यय न करता राज्याचे मुख्यमंत्री, अर्थमंत्री व कृषीमंत्र्यांनी मराठवाड्यात ताबडतोब ओला दुष्काळ जाहीर करावा आणि एकरी पन्नास हजार रूपयांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघाचे सरचिटणीस राजकुमार कदम यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे.


