जागतिक व्यासपीठावर जाण्यासाठी इंग्रजी भाषा महत्त्वाची – डॉ विशाल तायडे
जाफराबाद/विशाल देशमुख,दि.24
विद्यार्थ्यांना जागतिक पातळीचे व्यासपीठ मिळवण्यासाठी इंग्रजी भाषेची गरज आहे. इंग्रजी भाषेची गुणवत्ता वाढावी यासाठी कोटक एज्युकेशन फाउंडेशन यांच्या वतीने जालना छत्रपती संभाजीनगर व बीड या तीन जिल्ह्यांमध्ये कम्युनिकेटिव्ह इंग्लिश रेडीनेस प्रोग्राम राबविण्यात येत आहे असे प्रतिपादन राज्य आंग्ल भाषा संस्था छत्रपती संभाजीनगरचे विभाग प्रमुख डॉ. विशाल तायडे यांनी हॉटेल गॅलेक्सी येथे पर्यवेक्षकीय यंत्रणेच्या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी केले.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व जिल्हा परिषद जालना यांच्या संयुक्त विद्यमाने गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्ताराधिकारी, केंद्रप्रमुख व साधन व्यक्ती यांच्यासाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन डॉ.विशाल तायडे, प्राचार्य डॉ. विक्रम सारूक, शिक्षणाधिकारी श्रीमती संगीता भागवत, समन्वयक डॉ. प्रमोद कुमावत यांच्या हस्ते करण्यात आले.
शिक्षणाधिकारी श्रीमती संगीता भागवत यांनीही इंग्रजी भाषेच्या गुणवत्तेसाठी कोटक एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने जिल्हाभर आपण प्रशिक्षित शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविणार असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रमोद कुमावत यांनी केले. कोटक एज्युकेशन फाउंडेशनचे उमेश तरे, उपशिक्षणाधिकारी विनया वडजे, अधिव्याख्याता पांडुरंग चव्हाण, डॉ. श्रीहरी दराडे, योगेश्वर जाधव राजाराम टकले, भारत सूर्यवंशी सय्यद अख्तर, कोटक एज्युकेशन फाउंडेशन चे सर्व सदस्य, गटशिक्षणाधिकारी, सर्व केंद्रप्रमुख याप्रसंगी उपस्थित होते.


