प्रनिल काळे यांना पीएच.डी. पदवी प्रदान
जाफराबाद/विशाल देशमुख,दि.2
डॉ. प्रनिल सुनिल काळे यांनी सॅम हिग्गिनबॉटम कृषी, तंत्रज्ञान आणि विज्ञान विद्यापीठ, प्रयागराज (उत्तर प्रदेश) येथून कृषी व्यवसाय व्यवस्थापन या विषयात, कृषी अर्थशास्त्र विभागांतर्गत पीएच.डी. पदवी संपादन केली आहे.
त्यांनी “कॉटन कल्टिव्हेशन, सीड प्रोडक्शन ॲन्ड मार्केटिंग डायनॅमिक्स इन औरंगाबाद ॲन्ड जालना डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र स्टेट: ॲन इकॉनॉमिक ॲनालिसिस” या विषयावर प्रा. डॉ. आशिष समर्पित नोएल यांच्या मार्गदर्शनाखाली सखोल संशोधन केले. या अभ्यासातून मराठवाड्यातील कापूस शेती, बियाणे उत्पादन व विपणन प्रक्रियेचे आर्थिक विश्लेषण करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी धोरणात्मक उपाय सुचविण्यात आले आहेत.
डॉ. काळे यांनी कृषी पदवी शिक्षण छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचालित कृषी महाविद्यालय, कांचनवाडी (जि. छत्रपती संभाजीनगर) येथे पूर्ण केले. पदव्युत्तर शिक्षण त्यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत अॅग्री बिझनेस मॅनेजमेंट, चाकुर येथे पूर्ण करून सुवर्णपदक मिळवले.
पीएच.डी. शिक्षणादरम्यान त्यांना छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती – 2022 मिळाली असून, त्यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये उत्कृष्ट सादरीकरणासाठी पुरस्कार प्राप्त केले आहेत.
त्यांचे वडील श्री. सुनिल रेणुकादास काळे (एलआयसी, छत्रपती संभाजीनगर), मातोश्री सौ. प्रविणा काळे(गृहिणी), पत्नी सौ. प्रियांका काळे (महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ) व बहिण चैत्राली काळे (आय.डी.बी.आय. बँक, अंबाजोगाई) यांच्या प्रोत्साहनामुळे हे यश मिळाल्याचे त्यांनी जालना नायकशी बोलतांना सांगितले


