अरबी शिक्षणातील विद्यार्थिनींच्या यशाचा जल्लोष मदरसा अरबीया इस्लाहुल बनात, आरदखेडा येथे सत्कार समारंभ संपन्न

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.21
जाफराबाद तालुक्यातील अरत खेड़ा येथील मदरसा अरबीया इस्लाहुल बनात, आरदखेडा येथे अरबी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींनी आपल्या मेहनतीच्या, शिस्तबद्ध अभ्यासाच्या आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर उत्कृष्ट शैक्षणिक यश संपादन केले आहे. या उल्लेखनीय यशाचा गौरव करण्यासाठी मदरसा प्रशासनाच्या वतीने भव्य सत्कार व कौतुक समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास विद्यार्थीनी, पालक व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती.
कार्यक्रमात विद्यार्थिनींच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेत मान्यवरांनी समाधान व्यक्त केले. अरबी शिक्षण हे केवळ धार्मिक ज्ञानापुरते मर्यादित नसून ते नैतिकता, शिस्त, चारित्र्यनिर्मिती, संस्कार आणि सुसंस्कृत जीवनशैली घडविण्यास अत्यंत उपयुक्त असल्याचे प्रतिपादन यावेळी करण्यात आले. आजच्या स्पर्धात्मक युगात मुलींनी धार्मिक शिक्षणासोबत आधुनिक शिक्षणातही प्रगती करावी, असे मार्गदर्शन मान्यवरांनी केले.
या सत्कार समारंभास मौलाना शेख सलीम साहेब, मौलाना ईसा कासमी, मौलाना अन्वर साहेब, हाफिज अब्दुस सलाम साहेब, सय्यद नसरुल्लाह साहेब तसेच सुहेल नदवी यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी गुणवंत विद्यार्थिनींचे पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन अभिनंदन केले तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थिनींनीही आपल्या यशाचे श्रेय पालक, शिक्षकवृंद व मदरसा प्रशासनाला दिले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मदरसा व्यवस्थापन, शिक्षकवृंद, पालक व आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले. या यशामुळे मदरसा अरबीया इस्लाहुल बनात, आरदखेडा या संस्थेच्या शैक्षणिक कार्याचा नावलौकिक वाढला असून परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या यशामुळे भविष्यात अधिकाधिक विद्यार्थिनी अरबी शिक्षणाकडे आकर्षित होतील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.


