मोफत पास योजनेअंतर्गत असलेल्या बसेसची अनियमितता; मुलींच्या शिक्षणाची होणारी हेळसांड थांबवा- मराठवाडा शिक्षक संघाचे निवेदन!
ग्रामीण भागातील मुला मुलींच्या शिक्षणावर विपरीत परिणाम; विद्यार्थी-पालकांत प्रचंड असंतोष व चिड!
जालना/प्रतिनिधी,दि.5
आहिल्याबाई होळकर मोफत पास योजनेअंतर्गत चालू असलेल्या बसेसमधे कमालीची अनियमितता आहे, शाळेसाठी खटारा बस दिल्या जातात, त्या नेहमी मधेच बंद पडतात, त्यामुळे मुलींच्या शिक्षणाची प्रचंड हेळसांड होत आहे. परिणामी ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालकांमधे प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे. याची दखल घेऊन नियमित व चांगल्या बसेस सोडून मुलींच्या शिक्षणाची हेळसांड थांबविण्यात यावी अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघाचे सरचिटणीस राजकुमार कदम यांनी राज्याचे मुख्यमंत्री, शालेय शिक्षणमंत्री व परिवहनमंत्री यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मराठवाडा शिक्षक संघाचे सरचिटणीस राजकुमार कदम यांनी याबाबत दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, राज्यातील शालेय मुलींसाठी सरकारने आहिल्याबाई होळकर मोफत पास योजना सुरू केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाची निश्चित सोय झाली आहे. राज्यातील लाखो मुली या योजनेचा फायदा घेत आहेत. ग्रामीण भागातील मुले देखील पास काढून यि बसमधून शाळेत येजा करीत असतात. परंतु या योजनेअंतर्गत चालणाऱ्या बसेसमधे कमालीची अनियमितता आहे!
आषाढी, कार्तिकी, गणेशोत्सवा निमित्त आठ आठ दिवस या बसेस बंद असतात. राज्यातील एखादा मोठा नेता, मंत्री यांचा एखादा मोठा कार्यक्रम असल्यास कार्यकर्त्यांची ने-आण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बसेस अधिग्रहीत केल्या जातात. अशा वेळेस शाळेच्या बसेस बंद असतात!
आहिल्याबाई होळकर मोफत पास योजनेसाठी सुस्थितीतील बसेसे देणे आवश्यक आहे परंतु बहुतेक वेळा यासाठी दिलेल्या बसेस खटारा असतात, त्यामधे नेहमीच बिघाड होत असतो. बस येणार नाही असा ऐनवेळेस संदेश दिला जातो. अशा विविध कारणांमुळेच अनेकदा बसेस येत नसल्यामुळे मुलींची शाळा बुडते, परिणामी त्यांचे शैक्षणिक नुकसान होते. त्यामुळे ग्रामीण भागात विद्यार्थी व पालकांमधे प्रचंड असंतोष व चिड निर्माण झालेली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून आहिल्याबाई होळकर मोफत पास योजनेअंतर्गत चालू असलेल्या बसेसमधील अनियमितता दूर करावी, या योजनेसाठी सुस्थितीतील बसेस देण्यात याव्यात, यात्रा-जत्रा, नेत्यांच्या वा सरकारी, खाजगी कार्यक्रमासाठी या बसेस अधिग्रहित करण्यात येवू नयेत, मुलींच्या शिक्षणाची होणारी हेळसांड थांबविण्यात यावी अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघाचे सरचिटणीस राजकुमार कदम यांनी निवेदनाद्वारे केली आहे. बसेसमधील अनियमिता दूर न झाल्यास आणि सुस्थितीतील बसेस न सोडल्यास तीव्र आंदोलनाचा ईशारा मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव, सरचिटणीस राजकुमार कदम, कोषाध्यक्ष ए. बी. औताडे, उपाध्यक्ष ज्ञानोबा वरवट्टे,…. यांनी दिला आहे.


